Maharashtra Teacher Recruitment : राज्यात 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती

Maharashtra Teacher Recruitment : संपूर्ण राज्यातील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. शिक्षक भरतीचे वेळापत्रक झाले. यामुळे अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची आतुरता आता संपणार आहे. राज्यात मंगळवार (ता. १५)पासून भरतीला सुरवात झाली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकभरती आता ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे.

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ६४ हजार शिक्षकांची कमतरता आहे. मात्र, शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांना त्यांच्याकडील रिक्त शिक्षकांच्या पदांची माहिती बिंदूनामावलीसह पोर्टलवर अपलोड करावी लागेल. नंतर त्या शाळेत राज्य पातळीवरून एका जागेसाठी तीन उमेदवार पाठविले जाणार आहेत. तीनपैकी संस्थेला एका उमेदवाराची निवड करावी लागेल. या प्रक्रियेमुळे खासगी संस्थांचा मनमानी कारभार थांबणार आहे.

राज्य शासनाचा निवृत्त शिक्षकांना १० ते १२ पटसंख्या असलेल्या शाळांवर नियुक्तीचा निर्णय आहे. ही नियुक्ती शिक्षण सारथी योजनेंतर्गत होईल. निवड झालेल्या निवृत्त शिक्षकाला १० हजार रुपये मानधन दिले जाईल. सारथी योजनेंतर्गत ७० वर्षांपर्यंतचे निवृत्त शिक्षक नियुक्तीसाठी पात्र आहेत. निवृत्त शिक्षकांची नियुक्ती झाल्यास शिक्षक भरतीमधील रिक्त पदांची संख्या कमी होणार असल्याची शक्यता आहे. संच मान्यता पूर्ण होताच शिक्षक भरतीला सुरवात होईल. मात्र, त्यापूर्वी बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण होईल. १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान पोर्टलवर जाहिरात अपलोड होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार आणि ‘टेट’ व ‘सीएआयटी’ चाचणीतील गुणांवरून होईल.

यासाठी इच्छुक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी झाल्यावर १ ते १५ सप्टेंबरदरम्यान जिल्हा, जात प्रवर्ग, विषयाचा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर भरावे लागेल. त्यानंतर १० ऑक्टोबरला खासगी संस्थांना मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोर्टलद्वारे दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी निवडलेल्या उमेदवारांची पडताळणी ११ ते २१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान निवड झालेल्या उमेदवाराचे समुपदेशन करून त्यांची नेमणूक होईल.

Leave a Comment