सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी टेस्ट

Gas Cylinder Available Check : घाईच्या वेळी गॅस सिलिंडर संपणे ही एक महत्त्वाची समस्या असते. अशावेळी घरात भरलेला दुसरा सिलिंडर असेल तर ठिक नाहीतर शेजार पाजाऱ्यांना सिलिंडर मागण्याची वेळ अनेकदा आपल्यावर येते. काही वेळा सणवार, कार्यक्रम, पाहुणरावळे यांच्या नादात गॅसचा जास्त प्रमाणात वापर झाल्याचे आपल्या लक्षातच येत नाही. काही वेळा तर आंघोळीचे पाणीही गॅसवर तापवले जात असल्याने गॅस मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अशावेळी सकाळच्या गडबडीत किंवा ऐन घाईच्या वेळी गॅस सिलिंडर संपतो. मात्र असे होऊ नये आणि सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे आपल्याला समजावे यासाठी आज आपण एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. त्यामुळे ऐनवेळी होणारी पळापळ टाळता येईल आणि आपल्यालाही गॅस किती वापरायचा याचा अंदाज राहील.

काय आहे टॉवेलची सोपी ट्रीक?

एक टॉवेल घ्यायचा आणि तो ओला करायचा. हा टॉवेल सिलिंडरच्या भोवती गुंडाळायचा. जेव्हा सिलिंडरची टाकी ओली झाल्यासारखी वाटेल तेव्हा हा टॉवेल बाजूला काढून ठेवायचा. त्यांनतर टाकीचे निरीक्षण करायचे. टाकीचा साधारण एक भाग लवकर वाळतो आणि एक भाग जास्त वेळ ओला राहतो. सिलिंडरमधील गॅसची लेव्हल ओळखण्यासाठी हाच ओला आणि सुका भाग महत्त्वाचा असतो. याचा अर्थ असा की जो टाकीचा भाग लवकर कोरडा झाला आहे तेथे गॅस शिल्लक नाही किंवा तो संपला आहे.

गॅसचा जो भाग ओला राहतो त्या लेव्हलपर्यंत गॅस शिल्लक आहे असे समजावे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये काही प्रमाणात लिक्विड असते. तसेच सिलिंडरच्या जेवढ्या भागात गॅस आहे, तेवढा भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि तो लवकर वाळत नाही. पण ज्याभागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो. त्यामुळे ही अतिशय साधी अशी टेस्ट केल्यास सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे आपल्याला निश्चितच कळण्यास मदत होईल.

Leave a Comment